मुंबई : लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजलं असून निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटण्याचं नाव घेत नाहीय. यातच भाजपच्या कोअर कमिटीने आज मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. भाजपचे मुंबईतले सर्व आमदार, खासदार बैठकीला राहणार उपस्थित राहणार आहेत. अशातच आत महायुतीच्या जोडीला मनसे येण्याची शक्यता आहे.
मनसेच्या एन्ट्रीनं शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपकडे लोकसभेच्या 18 जागांसाठी मागणी केली होती. पण चर्चेनंतर शिवसेना 16 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याची माहिती मिळत आहे. अशातच मनसेच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढवलं आहे.
कारण मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना कोट्यातूनच मनसेला जागा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगरच्या जागेवरून घासाघीस सुरू आहे. तसेच, वाशिम, रामटेक, शिर्डी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार आणि मनसेला 1-2 जागा मिळण्याची चर्चा आहे. यावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.















Discussion about this post