छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकून कोट्यवधी रुपयाचा ऐवजी चोरीस गेला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला. अमोल खोतकर असं एन्काऊंटर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
घटना काय?
छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. यावेळी ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी असा सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. एवढ्या मोठ्या दरोड्याची राज्यभर चर्चा होती. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग केला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी ९ पथके तपास करीत होती.
आता या दरोड्याचा उलगडा झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील पाच जणांना ताब्यात घेतले होते.मात्र, दरोड्याचा मुख्य सूत्रधार पसार होता. त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता बाळगली होती. काल रात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना सापडल्यानंतर तो पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून जात होता अशा वेळेस एन्काऊंटर केले असल्याची माहिती आहे.
Discussion about this post