नागपूर । महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८ डिसेंबर) पासून नागपुरात सुरू होणार असून हे अधिवेशन रविवार (14 डिसेंबर) पर्यंत चालेल. विशेष म्हणजे, 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचं कामकाज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचे कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात आले असून, संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये एकूण अकरा विधेयक सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सहा अध्यादेश पटलावर ठेवले जाणार असून, पाच नवीन विधेयकांचा समावेश असेल.
सहा विधेयकं कोणती? :
शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या सहा अध्यादेशांचं विधेयकांमध्ये रूपांतर या अधिवेशनात मुख्य भाग ठरणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (दुसरी सुधारणा), महाराष्ट्र दुकानं व आस्थापना, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपरिषद-नगरपंचायतीं व औद्योगिक नागरी (सुधारणा), तसेच, महाराष्ट्र ग्रामपंचायत व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा ही विधेयकं या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या विधेयकांचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन, जमीन तुकडे रोखणे आणि विश्वस्त उत्पादन व्यवस्थेतील बंधनांना चालना देणे आहे.
पाच नवीन विधेयकांची नोंद होणार? : शासनानं या अधिवेशनात 5 नवीन विधेयकांची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक, महाराष्ट्र जनविश्वास विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था विधेयक, महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक, महाराष्ट्र (तिसरी पुरवणी) विनियोजन विधेयकांचा समावेश आहे.
या विधेयकांमध्ये महसूल, सामाजिक सुरक्षाव्यवस्था, वित्त व्यवस्थापन, भीकवृत्ती नियंत्रण आणि विश्वस्तव्यवस्थेतील पारदर्शकता वाढविणारी तरतुदी असल्यानं त्यांची सर्वदलीय स्तरावर सखोल चर्चा अपेक्षित आहे.















Discussion about this post