मुंबई । राज्यात जळगावसह २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने गुरूवारी म्हणजेच १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी कुणा-कुणाला सुट्टी असणार आहे हे जाणून घेऊया
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने १५ जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टी संदर्भातील स्वतंत्र अध्यादेश देखील काढले आहेत. महापालिका निवडणुका सुलभ करण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगर पालिकाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी १५ जानेवारीला शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजेच जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते अशा ठिकाणी कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी न देता २ ते ३ तासांची विशेष सूट देणे बंधनकारक असणार आहे. जेणेकरून ते कामगार त्या वेळेत मतदान करू शकतील.
मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खासगी कंपन्यांना सुट्टी असणार आहे. सार्वजनिक सुट्टी ही फक्त सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसणार आहे. १५ जानेवारीला केंद्र आणि राज्य शासनाची सर्व कार्यलये, सार्वजनिक उपक्रम आणि निमशासकीय संस्थांना सुट्टी असेल. सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांना सुट्टी असेल. आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर, खासगी कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यांना देखील सुट्ट्या असतील. त्याचसोबत सर्व कारखाना, दुकाने, खाद्यगृहे, नाट्यगृहे, निवासी हॉटेल्स आणि औद्योगिक उपक्रम याठिकाणी देखील सुट्टी असेल.















Discussion about this post