नवी दिल्ली । निवडणूक आयोगाची आज सायंकाळी 4.15 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR संपूर्ण देशभरात करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह सिंधू आणि विवेक जोशी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील. आगामी काळात ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असू शकतो. त्यानुसार पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीचाही या राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत तीन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत बैठक घेतली होती. त्या बैठकीत बिहारमध्ये एसआयआर राबवताना आलेल्या अनुभवांवर विचार करण्यात आला आणि एसआयआर प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा विचार करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बिहारमधील एसआयआर प्रक्रिया 24 जून ते 30 सप्टेंबर म्हणजे जवळपास चार महिने चालली. मात्र निवडणूक आयोग हा कालावधी कमी करण्याबाबत विचार करत आहे.
हा निर्णय बिहारमध्ये एसआयआर अंमलबजावणी करताना विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात आलेल्या तीव्र नाराजीनंतर घेण्यात आला. बिहारमधील एसआयआर प्रक्रियेचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. बिहारमध्ये निवडणूक आयोगानं एसआयआर प्रक्रिया राबवल्यानंतर 7 कोटी 42 लाख मतदारांची यादी 30 सप्टेंबरला प्रकाशित केली होती. त्यानुसार आता नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांचे नाव हटविणे, दुबार नोंदणी रद्द करणे, यादीतील इतर चुका दुरूस्त करण्याचे महत्वपूर्ण या प्रक्रियेत केले जाणार आहे.















Discussion about this post