जळगाव। जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात गिरणा नदीच्या काठावरील एका शेतात काम करत असलेल्या वयोवृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. इंदुबाई वसंत पाटील (७३) असं मयत महिलेचं नाव असून या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे.
देवगाव येथील इंदुबाई पाटील या नेहमीप्रमाणे स्वतःच्या शेतात काम करत होत्या. आजुबाजुला कोणी नसल्याचे लक्षात घेऊन लपून बसलेल्या एका बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने डोक्यावर तसेच चेहऱ्यावर खोल जखमा केल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
दुर्दैवाने घटनास्थळी त्यांच्या जवळपास कोणीही नसल्याने त्या जखमी अवस्थेत तशाच शेतातच बराच वेळ पडून राहिल्या. दुसऱ्या एका शेतात काम करणारे बाळू पाटील आणि रमेश सोनवणे यांना काही वेळाने इंदूबाई जखमी अवस्थेत जमिनीवर पडून असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ देवगावचे पोलीस पाटील न इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना इंदूबाई पाटील यांच्या जवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. पंचनामा करून इंदुबाई पाटील यांना उपचारासाठी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही केली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे देवगावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
Discussion about this post