जुन्नर । जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून रात्री लाईट नव्हती म्हणून दिवा लावला मात्र दिव्याने पेट घेतल्याने घराला आग लागून यात गुदमरून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत धुरामुळे गुदमरून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. जुन्नरमधील साबळेवाडीत ही घटना घडली आहे. मारुती भाऊ साबळे (वय 83) व पुताबाई मारुती साबळे (वय 73) असं या पती-पत्नीचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडी येथील आदर्श पुरस्कार विजेते माजी सरपंच मारुती भाऊ साबळे (वय 83) हे त्यांच्या पत्नी व पुताबाई मारुती साबळे (वय 73) पत्नीसमवेत राहत होते. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपले होते. रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली.
त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडल्यानं श्वास गुदमून दोघे जागीच कोसळले, धुरामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post