मुंबई । यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून सरकार स्थापनेसाठी महायुतीमध्ये हालचालींना वेग आलाय. दरम्यान महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची आज मुदत संपणार आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपवल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.
मिळालेल्या माहतीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. नवे सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं समजतेय. 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सत्ता स्थापन झालेली नसली तरीही नवी १५ वी विधानसभा अस्तित्वात. निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, निवडणूक आयोगाच्या २४ नोव्हेंबरच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रविवारी राज्यपालांना सादर केल्या आहेत.
मुख्यमंत्री कोण? मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु –
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात आता सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगात सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाबाबतच्या चर्चांसाठी युतीतील नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. अमित शाह आज मुंबईत येणार असल्याचं समोर आले आहे. अमित शाह मुख्यमंत्रिपदाचे कोडे सोडवण्यासाठीच मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय? याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Discussion about this post