मुंबई । सध्या राज्यात तीन मित्र पक्ष असलेल्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. मात्र त्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे दोन नेते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी निवासाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. तर, मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात शिरसाट बेडरूममध्ये बसलेले दिसत असून, बेडशेजारी पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. या प्रकरणानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली. दरम्यान, या दोन्ही प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कडक शब्दात कान टोचल्याची माहिती समोर आलीय.
दोन्ही संजय यांच्या कारनाम्यानंतर एकनाथ शिंदे तीव्र नाराज असल्याची चर्चा आहे. आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली. तसेच हा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही शिंदे म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शिलेदारांना कडक शब्दांत फटकारल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील तिन्ही नेत्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तिघांच्या कारनाम्यामुळे सरकरामध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना अपशब्दाचा वापर केला. नंतर त्यांचा हाणामारी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आमदार निवासातील निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला.
त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी भर सभागृहात अनिल परब यांच्याविरोधात वापरलेली शिवराळ भाषा. यावेळी त्यांनी धमकी दिली. त्यानंतर मंत्री संजय शिरसाट आधी आयकर विभागाच्या नोटीशीमुळे आणि आता बेडरूममधील व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर दिसत असून, त्यांच्या बेडच्या शेजारी एक पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. या व्हिडिओमुळे संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत.
Discussion about this post