मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमीकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं. एका निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही आहोत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. पण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“मी आता त्यांची प्रतिक्रिया ऐकली. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. काही आता जी निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत तर आम्हाला 2 लाख मतं जास्त मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे. राज्यातदेखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आम्हाला पुढेदेखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.















Discussion about this post