मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. तर आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. यातील एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले अमित शहा?
“शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना दिला. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे विधान अमित शाह यांनी एका बैठकीदरम्यान केले.
सध्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सध्या रंगत आहे. तसचे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले जाणार की कोणी दुसरा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी असणार, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
दरम्यान, आज महायुतीची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.यात महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post