जळगाव | उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.अनिल पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. एकनाथ खडसे यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी विधान परिषदेत दिलेल्या मताचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी असे आव्हान संजय पवारांनी केलं होते. दरम्यान, आज आ.एकनाथराव खडसे पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.
मी शरद पवारांसोबत प्रामाणिकपणे राहिलो. अजित पवारांनी सोडून जात विश्वासघात केला. मी शरद पवारांच्या आमदारांच्या भरवशावर निवडून आलो. मला शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मते मिळाली, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. संजय पवार फार मोठा माणूस नाही, मी त्याला उत्तर द्यावे. संजय पवारांनी राजीनामा द्यावा, तेच आमच्या साथीने जिल्हा बँकेत निवडून आले आहेत, असे आ.एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
आ.खडसे म्हणाले की, संजय पवारांनी मला अगोदर विचारले असते तर त्यांचा गैरसमज दूर झाला असता. माघार घ्यायची किंवा नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आजपासून नव्हे तर चार महिन्यांपासून आजारी आहे. मला निवडणूक पेलवणार किंवा नाही हे मी वैद्यकीय सल्ला घेतल्यावर जाहीर करेल असे वारंवार सांगितले होते. मला दीड महिन्यापूर्वी डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला. भाषण देखील आक्रमकपणे करू शकणार नाही. हृदयावर दडपण येईल. माझा वैद्यकीय अहवाल आल्यावर तो जयंत पाटील यांच्या हातात दिला आणि शरद पवारांना कळविले. निवडणूक लढविण्याची माझी पुरेपूर इच्छा आहे. पवारांची सभा जळगावात घेण्याची इच्छा माझी आहे. तुतारी चिन्ह मिळाल्यावर देखील सभा घेण्याची इच्छा होती. दि.२ डिसेंबर रोजी शरद पवारांनी माझ्या उमेदवारीबाबत वैद्यकीय कारण असल्याचे बैठकीत जाहीर केले होते, असे खडसेंनी सांगितले.
खडसे पुढे म्हणाले की, मधल्या काळात माझ्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. गौण खनिज दंड व इतर अडचणींचा विचार सुरू असताना पत्नीला देखील वैद्यकीय त्रास उद्भवला. रोहिणी यांनी लोकसभा बाबत विचार केलाच नाही त्या केवळ विधानसभा मतदार संघाचा विचार करीत आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आमची घराणेशाही नाही. आम्ही एक एक टप्पा पुढे सरकत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पोहचलो. आम्ही जनतेतून निवडून आलो आहे. संजय पवार जनतेतून निवडून आले नाही, असा टोला आ.खडसेंनी लगावला.















Discussion about this post