जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमानस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका आरोप प्रत्यारोप दोघे मातब्बर नेते नेहमी करत असतात. याच दरम्यान आता एकनाथ खडसे यानी मंत्री महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्याजवळ गिरीश महाजन यांची किंमत फक्त एक रुपयाची आहे, असा जोरदार टीका खडसेंनी केली.
एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जळगावात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपण गिरीश महाजन यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल केल्याची माहिती दिली. गिरीश महाजन यांनी वारंवार खोटे नाटे विधाने करून मला छळण्याचे काम केले. तसेच बदनामीकारक विधान करून समाजात माझी बदनामी केली.
मागच्या काळात मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्यांनी माझ्या आजारपणाबद्दल शंका उपस्थित केली. माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दलही त्यांनी संशयास्पद वक्तव्ये केली. त्यामुळे मी त्यांच्या विरोधात जळगाव जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
महाजन 1 रुपयाचा माणूस
माझ्या लेखी गिरीश महाजन यांची किंमत अवघ्या 1 रुपयाची आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात 1 रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे, असेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
Discussion about this post