जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला असून त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे. महाजन यांचा आरोग्यदूत तुषार जगताप हा ‘गुटखाकिंग’ असून, त्याच्याकडून जामनेर तालुक्यातील नेरी, नांद्रा यासह परिसरात दर आठवड्याला दहा, बारा लाखांचा गुटखा विकला जातो, असा आरोप खडसेंनी केला आहे.
जळगाव शहरातील बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे पत्रकार परिषद सुरू असताना खडसे यांना नांद्रा येथील त्यांचा कार्यकर्ता राजेंद्र आनंदा गांगुर्डे याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची भ्रमणध्वनीवर माहिती दिली.
दरम्यान, आमदार खडसे म्हणाले, की महाजन यांचे दुसरे नाशिकचे सहकारी कोष्टी याच्यावरही मोक्का लावण्यात आला असून, महाजन यांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार जिल्ह्यात सेटल होत आहेत.
शासकीय रिक्त पदांबाबत खडसे म्हणाले, जिल्ह्याचे ग्रामविकासमंत्री असताना बहुतांश तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. एकट्या बोदवड तालुक्यात ३८ ग्रामपंचायती असून, यात ४९ गावे आहेत. तालुक्यात केवळ १४ ग्रामसेवक आहेत. शासकीय कार्यालयाची बिकट परिस्थिती आहे. या रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोललो असता शिक्षक भरती आठ दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले, परंतु अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
Discussion about this post