जळगाव : शेतकऱ्यांच्या कापसाला तसेच इतर शेतमालाला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे जामनेर येथे आंदोलन करण्यात आले, यादरम्यान,राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचे बाण सोडले. गिरीश महाजन यांनी माझ्या मागे ‘ईडी’लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लागला असं खडसे म्हणाले. तसेच आज महाजन यांच्याकडे सत्ता आहे, त्याजोरावर ते दडपशाही करीत आहेत असा आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे, परंतु बोलणाऱ्यांच्या मागे इडी, सीबीआय लावायची अशा स्वरूपाच्या चौकशा करून दडपशाही करण्याचे धोरण सत्ताधारी राबवीत आहेत. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामागेही इडी लावण्यात आली आहे.
गिरीश महाजनांनी तर माझ्यामागे सर्वच यंत्रणा लावल्या आहेत आणि मला विचारतात माझ्यावर मोक्का का लावला? तुम्ही माझ्यामागे इडी लावली म्हणून तुमच्यावर मोक्का लागला, जर इडी आली नसती तर मोक्काही लागला नसता असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही. सत्तेचा माज हा फार काळ टिकत नाही, असंही खडसे म्हणालेत.आता तर न्यायालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस दिली असल्याचं वक्तव्यसुद्धा खडसे यांनी केलंय.
माझ्यावर कारवाई का होत आहे, हे सुद्धा कळत नाही. मी काय चोऱ्या की उच्चक्या केल्या, कि फर्दापूरच्या रेस्ट हाऊसला गेलो, त्यावेळचे पेपर काढले तर सुरा आणि सुंदरी, मदिरा आणि मीनाक्षी यांचे किस्से ऐकायला मिळतील. अशा ठिकाणी आपण नव्हतो, परंतु अशा ठिकाणी आपले मंत्री महोदय असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही असा आरोपही त्यांनी केला.
Discussion about this post