जळगाव । भाजपमध्ये असताना भ्रष्ट्राचाराचे आरोप झाल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून भाजप आणि खडसे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळते. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपकडून आपल्याला मोठी ऑफर असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांना सोडण्यासाठी अजित पवार गटाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आपल्याला फोन केले असल्याचा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
दरम्यान जळगावात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावत शरद पवारांना चिटकून राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी वरील दावा केला आहे.
एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारण्यात आले होते. शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र, मी कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी मी उतावीळ असल्याचा गिरीश महाजन यांचा आरोप चुकीचा असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. उलट भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी मलाच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post