जळगाव । इंदूर ते हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असून यात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यात आ. चंद्रकांत पाटील सहभागी झाल्याने आंदोलन चिघळले. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतलं. मात्र यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटलांवर टीका केलीय.
तकऱ्यांच्या जमीनीचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांचे आंदोलन योग्य असले तरी त्यांची शासन दरबारी पत नाही का? असे नमूद करत आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.
शेतकऱ्यांचे हित व्हावे ही आपली देखील इच्छा आहे. तर, आ. चंद्रकांत पाटील यांच्या यासाठीच्या आंदोलनाबाबतही आपले काही म्हणणे नाही. तथापि, ते स्वत: सत्ताधारी आमदार असतांना देखील त्यांना आंदोलन करावे लागते म्हणजे त्यांची शासन दरबारी पत नाही का ? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारला.
दरम्यान खडसे पुढे म्हणाले की, आमदार पाटलांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारायला हवा होता. त्यांनी तेथे आंदोलन करायला हवे होते. अथवा त्यांनी आपल्या नेत्यांकडे याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र असे न होता त्यांना रस्त्यावर उतरावे लागते ही गैर बाब असल्याचे खडसे म्हणाले. तर या शेतकऱ्यांच्या जमीनीच्या मोबदल्याबाबत तांत्रिक अडचणी असून याबाबत आपण महसूल मंत्र्यांशी बोलणे केल्याचीही माहिती त्यांनी दिली. आपण या आंदोलनग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
Discussion about this post