मुंबई/जळगाव । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचे दिसून आले आहे.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कापसाच्या विषयावर बोलतांना खडसे यांनी सभागृहात उपस्थितीत असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना छेडले.
कापसाच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी केलेल्या उपोषणाची आठवण करून देतांना टोलेबाजी केली. शेतकऱ्यांचा ५० टक्के कापूस हा अजूनही घरात पडून आहे, तो तुम्ही सोडवा. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, असे बोलले जाते, पण मला वाटत नाही असा चिमटा खडसे यांनी काढला. यावर मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे असे उत्तर महाजन यांनी दिले.
यावर तसे असते तर तुम्ही आतापर्यंत जळगावचे पालकमंत्री झाला असतात, अशी कुरघोडी खडसे यांनी केली. त्यानंतर कापसाच्या प्रश्नावर सरकारच्या वतीने उत्तर देतांना महाजन यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे, कापसाचा प्रश्न गंभीरच आहे. याविषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलले आहेत.
कापूस निर्यात व भाववाढी संदर्भात ही चर्चा झाली. त्यामुळे अधिवेशन संपण्यापुर्वीच यावर सरकारच्या वतीने ठोस घोषणा केली जाईल. त्यामुळे खडसे यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे की नाही? याची काळजी करू नये. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे, तुमची अवस्था काय आहे? हे पहा. तुम्ही कुठे होतात आणि कुठे आलात. मतदारसंघातच तुम्ही पडले, गावची ग्रामंपचायत देखील तुमच्या ताब्यात नाही, जिल्हा बॅंकेतून तुम्ही गेलात, नगर परिषद तुमच्याकडे नाही. तेव्हा माझी चिंता करू नका, इथेही तुम्हाला मागच्या दाराने यावे लागले, असा टोला महाजन यांनी खडसेंना लगावला.
Discussion about this post