मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी, “शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या हायकमांडने घेतली आहे. त्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे,” असे मोठे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून नवीन चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांनी याविषयी बोलताना, “भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी समोर येत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या हायकमांडने घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आहेत. हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असं भाजपावाल्यांना वाटत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांची काम मंत्री करत नाही. त्यामुळे त्यांच्यात मतभेद आहेत.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना खडसे यांनी, “त्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्णत्वास गेलं नाही. या कामात गैरव्यवहार झाला आहे. याचे अहवाल दिल्लीतील वरिष्ठांकडे गेलेले आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटलांना हटवलं पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या वरिष्ठांनी घेतली आहे,” असेही सांगितले.
Discussion about this post