नवी दिल्ली । माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले.
एकनाथ खडसेंसोबत खासदार रक्षा खडसे यांनी देखील अमित शहांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अद्याप एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच अमित शहांसोबतची त्यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला तरीदेखील एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही ठरताना दिसत नाही. तसेच लोकसभेच्या रणधुमाळीदरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही भेटीसाठी वेळ दिला नसल्याचं बोललं जात होतं.
अशातच काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एकीकडे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलेला असताना, दुसरीकडे अमित शहांसोबतच्या भेटीला राजकीय वर्तुळात मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती.
दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. या भेटीदरम्यान अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सून रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपला पाठिंबा देत महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली होती.















Discussion about this post