मुंबई : राज्यात मागील काही दिवसात मंत्र्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्र ‘सामना’ने केला आहे. विशेष महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार आहे. यामध्ये शिंदे गटाचे चार, तर भाजपमधील दोन मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय, विधानसभा अध्यक्षपदावरून राहुल नार्वेकर यांना हटवून सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.असाही दावा यामध्ये करण्यात आला आहे.
‘हिटलिस्ट’वरील मंत्र्यांची नावे
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) : विधानसभेत ‘जंगली रमी’ खेळताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने आणि वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे सतत चर्चेत आहेत. अजित पवार यांनीही त्यांच्या मंत्रिपदाबाबत सुतोवाच केले आहेत.
संजय शिरसाट (शिंदे गट): घरात नोटांची बंडले आणि हॉटेल लिलाव प्रकरणातील आरोपांमुळे शिरसाट अडचणीत आहेत.
योगेश कदम (शिंदे गट): सावली बार प्रकरणामुळे गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला आहे.
नरहरी झिरवळ (शिंदे गट): कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव आणि क्षेत्रातील अपयश यांच्यावरून टीका.
नितेश राणे (भाजप): वादग्रस्त वक्तव्यांमुळे राणे यांचे मंत्रिपद धोक्यात आहे.
जयकुमार गोरे (भाजप): महिलेच्या आरोपांमुळे गोरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह.
भरत गोगावले (शिंदे गट): कार्यक्षमता आणि वादग्रस्त वर्तनामुळे चर्चेत.
दादा भुसे (शिंदे गट): हिंदी सक्ती आणि शालेय शिक्षण विभागातील वादग्रस्त निर्णयांमुळे टीकेचे लक्ष्य.
राजकीय धक्कातंत्राची शक्यता
‘सामना‘च्या दाव्यानुसार, फडणवीस मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करून राजकीय ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद, तर राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामगिरीवरही समाधान नसल्याने हे बदल अपेक्षित आहेत.
Discussion about this post