छत्रपती संभाजीनगर : राज्यात तापमान घसरणीसह भाजीपाल्याचे दरही घसरले आहे.बाजारात आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. एकीकडे शंभर रुपयावर विकल्या जाणाऱ्या टॅमॅटोंना दहा ते पंधरा रुपये किलोचा दर मिळत आहे. तर कोथिंबीरसह मेथीलाही भाव नसल्याने शेतकरी हतबल झालाय. यातच यातच वांग्याला १० रुपये किलोचा दर देखील मिळत नसल्याने वाहतूक खर्चही निघेना. तसेच व्यापारी घेण्यासाठीही तयार नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने वांग्यांची तोडणी करत वांगे फेकून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्याने रस्त्यावर वांगे टाकून निषेध केला. सिल्लोडच्या आठवडी बाजारासाठी तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन बाजारात येतात. मकरसंक्रांतीचा बाजार असल्याने भाजीपाल्याला चांगला दर मिळेल; अशी आशा वांगे उत्पादक शेतकऱ्यांना होती. पण उलटेच घडले.
प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत घसरण
सिल्लोड तालुक्यात १४०० हेक्टर भाजीपाल्याची लागवड झालेली आहे. मध्यंतरी भाजीपाल्यावर पडलेल्या रोगराईमुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करून रोगराई आटोक्यात आणावी लागली. आता दोन पैसे हाती येतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. अशातच बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर घसरल्याचे दिसून येत आहे. वांगे व कोबीच्या दरात साधारण ५० ते ७० रुपयांपर्यंत दराची घसरण झाली आहे.
बाजारात मागच्या आठवड्यात मिळालेला दर देखील भाजीपाल्याला मिळाला नाही. कवडीमोल दराने अनेकांनी भाजीपाल्याची विक्री केली. विशेष म्हणजे या बाजारात वांगी ५० तर कोबीचे दर ७० रुपये प्रतिकिलोने घसरल्याचे दिसून आले. अनेकांनी भाजीपाला टाकून दिला आहे. जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्याने अर्धा एकरात वांगे लावले होते. वांग्याचे भाव कोसळल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वांगी तोडून फेकून दिली. यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत आहे.















Discussion about this post