बारामती । राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीनं छापा टाकला आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा ठिकाणांवर धाड मारली आहे. यात पुणे, बारामतीसह संभाजीनगरातील कार्यालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ही धाड मारण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचं बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. बँकेचा तपशीलही तपासला जात असून संगणकातील फोल्डरही पाहिले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. हा कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने केवळ ५० कोटी रुपयांमध्ये लिलावात खरेदी केला असून या लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा त्यांचा दावा होता. यासाठी त्यांनी राज्य सहकारी बँकेवरही निशाणा साधला आहे.















Discussion about this post