जळगाव । ईडीच्या कारवाई संदर्भातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीने जळगाव येथील सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या जळगावसह मुंबई, सिल्लोड, ठाणे आणि कच्छमधील एकूण 70 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. एकूण 315 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत कशा कशाचा समावेश आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
यापूर्वी ईडीकडून राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. छापेमारी करताना ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव माजी आमदार मनीष जैन आणि त्यांच्या सून या चार जणांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. समन्सनुसार 22 ऑगस्ट रोजी मनीष जैन आणि त्यांच्या पत्नी या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी ईश्वरलाल जैन आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावलं होतं.
आता ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तेचे मूल्य रु. 315.60 कोटी एवढे आहे. दरम्यान, आर.एल गोल्ड प्रा. लि. आणि मेसर्स मनराज ज्वेलर्स प्रा. लिमिटेड यांच्यावर पीएमएलए २००२ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post