मुंबई । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार थंडावला असून यानंतर आता उद्या बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे.
खासगी वहिन्यांच्या मालिकेमध्ये शिंदेंच्या पक्षाने छुपा प्रचार केल्याचा ठपका या नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या तक्रारीनंतर ही नोटीस पाठवली जात असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे.सदर नोटीशीला 24 तासांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश शिंदेंच्या पक्षाला देण्यात आले आहेत.
काय आहे पत्राचा विषय?
‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता कालावधीत विविध वाहिन्यांवर छुप्या पद्धतीने प्रचार करीत असल्याबाबत तक्रार’ असा निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्राचा विषय आहे. तसेच विषयाखाली ‘सचिन सावंत, मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे पत्र दिनांक 15 नोव्हेंबर 2024’ असं नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विक्रम निकम यांनी हे पत्र पाठवलं आहे. हे पत्र शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना पाठवण्यात आलं आहे.
या नोटीसमध्ये आहे तरी काय?
निवडणूक आयोगाने शिंदेंच्या शिवसेनेला पाठवलेल्या नोटीशीमधील मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे:
विषयांकीत प्रकरणी संदर्भाधीन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील काही मालिका उदाहरणार्थ ‘मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’ व इतर काही मालिकांचे चित्रीकरण करताना त्यामध्ये आपल्या पक्षाच्या रस्त्यावरील जाहिराती दाखवून आशाप्रकारे आपला पक्ष छुपा मार्गाने प्रचार करीत असल्याची तसेच सदर छुप्या जाहीरातींसाठी आपला पक्ष काही रक्कम देण्याची शक्यता सदर तक्रारीमध्ये वर्तविण्यात आली आहे. सबब, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे पुढील 24 तासांच्या आत या कार्यालयास सादर करावे, ही विनंती.
Discussion about this post