धुळे । धुळे जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे वाहन धारक धास्तावले आहे. यातच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
धुळे शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांकडून अनेकदा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. यानंतरही दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशात पुन्हा एक दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
पळासनेर परिसरातून चोरट्यास अटक
गमदास उर्फ गमा देवराम भिल असे पोलिसांनी ताब्यात घेत्लेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची दुचाकी चोरी गेली होती. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीवरून चोरी गेलेली मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले.
सव्वातीन लाख किमतीच्या मोटारसायकल जप्त
पोलिसांनी गमदास याची कसून चौकशी केली असता चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
Discussion about this post