जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली असून यामुळे खरीप हंगामातील पिके करपू लागली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही.जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत २२ टक्केच पाऊस झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची चाहुल लागत असून, मायबाप सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रीम पाऊस तरी पाडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात वेळेवर पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता काही भागात १५ ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
आकाशात पावसाच्या ढगांऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ढग रोज अंधार करत आहेत. त्यामुळे अगोदरच कापसाच्या पडलेल्या भावामुळे नैराशात असलेला बळीराजा आणखीनच अडचणीत सापडला आहे.
जुनच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात दमदार पावसाच्या सलामीने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करून टाकली. त्यानंतरही पावसाने हजेरी लावली. मात्र पिक ऐन मोसमात असताना पावसाने पाठ दाखविल्याने खरीप हंगाम दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. गिरणा पट्ट्यात तर गेल्या तिन वर्षानंतर प्रथमच भयावह परिस्थिती ओढावली आहे. ऑगस्टमध्ये चाळीसगाव तालुक्यात ८, भडगावला १५, तर पाचोऱ्यात २५ टक्केच पाऊस झालेला आहे.
Discussion about this post