यावल । तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतात ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये तोल जावून पडलेल्या चालकाचा अतिशय करूण अंत झाला. दुर्घटना इतकी भयंकर होती की त्यात ३१ वर्षीय तरुणाच्या विजय कोळी मृतदेहाचे लहानलहान तुकडे झाले. हे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला. शरीराचे झालेले तुकडे एका कापडात बांधून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणावा लागला.
डांभुर्णी येथील शेतकरी हरि भगवान फालक यांच्या शेतात (गट क्रमांक १००८/१) ७४४ एफ.ई. ट्रॅक्टरद्वारे चालक विजय जानकीराम कोळी-बाविस्कर (वय ३१, रा.डांभुर्णी) हा मंगळवारी दुपारी रोटाव्हेटर करीत होता. यावेळी तो ट्रॅक्टरवर एकटाच होता. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेतमजुरांनी ट्रॅक्टर मालक केतन फालक यांना, तुमच्या शेतात ट्रॅक्टर एकाच जागेवर गोलगोल फिरत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी व मजुरांनी शेतात पाहणी केल्यावर विजयचा रोटाव्हेटरमध्ये अडकून मृत्यू झाल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच यावल पोलिस ठाण्यातील हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले, भरत कोळी घटनास्थळी आले. तेथे विजय कोळी यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता.
शरीरातील अवयवांचे लहानलहान तुकडे विविध भागांमध्ये पसरले होते. पंचनामा करून मृतदेहाचे तुकडे एकत्र कापडात बांधून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. केतन फालक यांच्या खबरीवरून यावलला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र बागुले करत आहे. दरम्यान, तुरूंगातून पॅरोल रजा घेऊन विजय कोळी ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. या मिळणाऱ्या पैशातून कुटुंबास आर्थिक मदत होईल म्हणून तो काम करायचा. पावसाळा सुरू झाला की शेती कामे बंद होतील. मग तुरूंगात जावू असे सांगून तो गावात होता. पण नियतीने घात केल्याचे नागरिकांनी सांगितले















Discussion about this post