मुंबई । भाजपच्या प्रवक्ता राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत अनेक गंभीर आरोप केले असून या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश बनवणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?’, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
आरती साठे या २ वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिल्या होत्या. आरती साठे यांची आता मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टातील कॉलेजिमयने २८ जुलैला मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई हायकोर्टात ३ नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये आरती साठे यांची देखील न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. यावरून आता राजकारण तापले आहे. आरती साठे यांच्या नेमणुकीवरून विरोधक संतप्त झाले आहेत. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे.
सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना… pic.twitter.com/d3w2rIHNK2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 5, 2025
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आरती साठे यांच्या नेमणुकीवर अनेक संतप्त सवाल केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?’
Discussion about this post