धुळे : अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना धुळे शहरातून समोर आलीय. डिंपल मनोहर वानखेडे (वय 8) असं चिमुकलीचे नाव असून या घटनेने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत. धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील यशवंत नगर साक्री रोड येथे डिंपल आपल्या घराच्या अंगणात मुलांसोबत फुगा फुगवत असताना ही घटना घडली आहे. फुगा फुगवत असताना तो अचानक फुटला आणि फुग्याचा तुकडा चिमुकलीच्या घशात अडकला आणि तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. सदर प्रकार हा तिच्या बरोबरच्या लहान मुलांनी तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिची हालचाल बंद झाली होती. दवाखान्यात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. रबरी फुगा तोंडात फुटल्याने त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमूकलीला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Discussion about this post