नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाजवळ खालीखांबचौदर शिवारात आज दोन वेगवेगळे भीषण अपघात झाले आहेत. एका अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे, तर दुसऱ्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
नंदुरबार जिल्ह्यातून धुळे- सुरत असा महामार्ग जातो. हा महामार्ग कोंडाईबारी घाट रस्त्यातून जात असून याठिकाणी वाहने नेहमी धीम्या गतीने जात असतात. दरम्यान जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे घाट रस्त्यातून वाहतूक हळू जात असून आज सकाळच्या सुमारास घाट रस्त्यातच दोन वेगवेगळे अपघात झाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तेल वाहतूक करणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जात असलेल्या इको कारला मागून जोरदार धडक दिली. तर कारला धडके दिल्यानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे. दरम्यान अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तर दुसऱ्या घटनेत धुळ्याहून सुरतच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाला रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज आला नाही. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कंटेनर सुमारे वीस ते पंचवीस फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही अपघातांमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
Discussion about this post