राज्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच बीड तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. भरधाव कंटेनरने ६ जणांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. ही घटना बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरचा नियंत्रण सुटले. कंटेनरने सहा जणांना रस्त्यावर चिरडले. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन गंभीर अवस्थेत होते.
अपघातातील मृत व्यक्ती पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची माहिती आहे. मात्र, दर्शनाआधीच अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला.
विशाल श्रीकिसन काकडे रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर, अमोल नामदेव गरजे, रा. बोधेगाव, ता. शेवगाव, आकाश कोळसे, पवन जगताप आणि किशोर तोर, रा. बाबुलतरा, ता. गेवराई असे मृतांची नावे आहेत. इतर मृतांबाबत माहिती समोर येणं अद्याप बाकी आहे. सध्या पोलिसांना या अपघातातबाबत माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी तपास करून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपूलजवळ अशाच प्रकारचा भीषण अपघात घडला होता. कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.















Discussion about this post