धुळे : धुळे शहरातील आग्रा रोड परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे तीन ते चार दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत साहित्य जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात हि घटना घडली आहे. प्रामुख्याने बॅगच्या दुकानाला शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुकानात बॅग असल्याने आगीचा भडका अधिक प्रमाणात उडाल्याने बाजूच्या दुकानांना देखील आग लागली होती. यामुळे बाजूच्या तीन ते चार दुकानांना देखील या आगीने आपल्या लपेट्यात घेतले. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.
वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप दुकान मालकांनी लावला आहे. दरम्यान रात्री आठ वाजता शॉकसर्किट होत असल्याने दुकान मालकाने याबाबत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितला होता. त्यानंतर देखील वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुकान मालक दुकान बंद करून घरी गेले असता दुकानात अचानक मोठ्या प्रमाणात शॉक सर्किट मुळे आग लागली होती.
लाखो रुपयांचे नुकसान
आगीमध्ये चार दुकानांना आग लागली आहे. यामध्ये दुकानातील मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले असल्यामुळे लाखोंचे नुकसान या आगीच्या घटनेमध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. तर माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले असून, शिष्टमंडळासह वीज वितरण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार असल्याचे देखील चंद्रकांत सोनार यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post