धुळे : धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील बळसाणे गावचे पोलीस पाटील आनंदा भटा पाटील याला लाच घेताना अटक केली आहे. निजामपूर पोलिसांच्या नावाने तडजोडीअंती 8 हजार रुपये लाच घेताना रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे बळसाणे गावातील रहिवासी असून, त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलीस ठाण्यात एका प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. संबंधित पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांना भेटून, पोलिसांना 10 हजार रुपये द्यावे लागतील, तरच दोषारोपपत्र लवकर दाखल होईल, असे सांगितले. लाचेची मागणी केल्याची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलीस पाटलांनी तडजोडीअंती 8 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. या पथकात राजन कदम, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील आणि प्रविण पाटील यांचा समावेश होता.
सापळा कारवाईदरम्यान, पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदाराकडून लाच रकमेपैकी 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारला आणि त्याचवेळी त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post