धुळे : धुळ्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात आर्मीत नोकरीचे स्वप्न भंगल्याने उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना धुळे तालुक्यातील रामी येथे घडली आहे. अक्षय यशवंत माळी (21) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे तालुक्यातील रामी गावातील अक्षय माळी हा तरुण आर्मीमध्ये भरती होण्यासाठी झटत होता. कुटूंबातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र दोन मार्कांनी त्याची संधी हुकल्याने तो निराश झाला होता.
अक्षय माळी याने गावालगत मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी घेतली माळी कुटुंबियांची भेट
दरम्यान, अक्षय माळी याच्या आत्महत्येनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे, अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या. अक्षयचे वडील यशवंत माळी हे शेतकरी आणि माळकरी असून, मुलाच्या दु:खाने ते कोसळले आहेत. मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतो, दोन दिवसांपासून झोप लागत नाही, असे सांगताना त्यांचे हुंदके आवरत नव्हते. मी कधी त्याला शेतात कष्ट करायला पाठवले नाही. हवे ते शिक, असेच नेहमी सांगत होतो. मात्र, आज त्यालाच खांद्यावर उचलावे लागले, या शब्दांत त्यांनी हुंदके देत आपल्या भावना एसपी धिवरे यांच्याकडे व्यक्त केल्या. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post