धुळे । शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील कार्यालयात प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.छोटू महादू पाटील असं लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. विशेष लाचखोर छोटू पाटील यांना सुमारे ९० हजार रुपये पगार आहे. पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीचे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत संपादन झाले होते. त्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त दाखल्याची आवश्यकता होती. याकरिता त्यांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी (पनर्वसन) धले यांच्याकडे अर्ज केला होता, जो चौकशीसाठी तहसीलदार, शिंदखेडा यांच्यामार्फत मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्याकडे आला होता.
तक्रारदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करूनही, पाटील यांनी चौकशी अहवाल तहसीलदारांकडे पाठवला नाही. अखेर दि. १८ जून रोजी तक्रारदारांनी चिमठाणे येथील कार्यालयात पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अहवाल पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी याची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. दि. १९ जून रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत पाटील यांनी तडजोडीअंती २ हजार रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार, दि. २० रोजी सापळा रचण्यात आला आणि चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पाटील यांना २ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे
Discussion about this post