धुळे । धुळ्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील निरीक्षक किशोर देशमुख यांना पंटरमार्फत ८ हजारांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून याबाबात या प्रकरणी उशीरापर्यंत आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुमारे ८० हजार रुपये पगार असताना देशमुख यांनी लाच घेतली. शहरातील पारोळा चौफुलीजवळ ही कारवाई झाली. शिरपूर येथील व्यापारी संकुलात पशुपक्षी फर्म सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे २५ फेबुवारीला ऑनलाइन अर्ज केला होता. या अर्जावर पुढील प्रक्रिया होणे अपेक्षीत होते. त्यासाठी तक्रारदाराच्या एका नातलगाने औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. स्थळ परिक्षण करताना तुषार जैन यांच्याकडे ८ हजार रुपये द्यावे लागतील असे त्यांना सांगितले होते.
याबाबत संबधित नागरीकने लाचलुचपत प्रतिबधंक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत शिरपूरला जाऊन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाचेची रक्कम घेण्यासाठी पंटर तुषार जैन हा पारोळा रोड चौफुलीवर कारने आला होता. त्याला लाच स्विकारताना व त्यानंतर कार्यालयातून निरीक्षक किशोर देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी दुपारी ही कारवाई झाली.
जळगावच्या घराची झडती
संशयित देशमुख यांचे कुटूंबिय जळगाव येथे राहते. घटनेनंतर पथकाने याबाबत जळगावच्या पथकाशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर जळगाव पथकाच्या मदतीने देशमुख यांच्या घराची झडती घेण्यात आली. सायंकाळपासून ही झडती सुरू होती.
Discussion about this post