धुळे । धुळ्यात बनावट नोटा उपलब्ध असून त्या कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोशल मीडियाचा वापर करून हे आमिष दाखवले जात होते. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात एक तर निजामपूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका टोळीतील २५ जणांची नावे समोर आली आहे. या टोळीत महिलांचा देखील समावेश आहे.
सोशल मीडियावर बनावट भारतीय नोटा देण्याचे आमिष दाखवण्यात येत होते. त्यासाठी बनावट नावाने अकाऊंट तयार करुन रिल्स सोशल मीडियावर अपलोड केले जात होते. फसवणुक करण्याच्या उद्देशाने अपप्रचार केला जात होता. या विषयीची माहिती पोलिस दलाला मिळाल्यानंतर काही दिवसांपासून तांत्रिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू होता.
या प्रकरणी धुळे तालुक्यातील अजनाळे, हॅकळवाडी व साक्री तालुक्यातील जामदा, टिटाणे येथील काही जणांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर निजामपूर पोलिस ठाण्यात दोन गुन्ह्यात २० जणांवर तर धुळे तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post