धुळे । दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून याच दरम्यान, धुळे स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली. ज्यात अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. अल्ताफ मुक्तार कुरेशी (21, दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर आरोपीचा साथीदार पसार झाला आहे.
धुळ्यातील संदीप अमृत चौधरी (प्रभात नगर, देवपूर, धुळे) यांची दुचाकी (एम.एच.12 एफ.क्यू.2170) ही 5 ऑक्टोबर 2024 रोजी चोरी गेल्यानंतर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल होता. हा गुन्हा संशयीत अल्ताफने केल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. आरोपीला मोहाडी परिसरातील तिखी भागातून बेड्या ठोकल्यानंतर त्याने धुळ्यातून लांबवलेली दुचाकी काढून दिली तसेच त्याने साथीदार खुशाल उर्फ मनोज अशोक मोकाळ (मोहाडी, जि.धुळे) सोबत चोर्या केल्याची कबुली देत चोरी केलेल्या दोन लाख 25 हजार रुपये किंमतीच्या एकूण नऊ दुचाकी काढून दिल्या.
धुळ्यातील देवपूर व इंदिरानगर, नाशिक हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले मात्र सात दुचाकींबाबत चेचीस क्रमांकावरून खातरजमा केली जात आहे. दरम्यान, आरोपीचा साथीदार मोकाळ हा पसार असून त्याचाही शोध सुरू आहे.
Discussion about this post