धुळे । धुळ्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात सैन्य दलात कार्यरत असलेल्या पतीने विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शारदा उर्फ पूजा कपिल बागुल यांचा विवाह 8 जून 2010 रोजी धुळे येथील कपिल बाळू बागुल यांच्याशी झाला होता. कपिल बागुल हे सैन्य दलात कार्यरत आहेत. लग्नानंतर काही काळ आनंदात गेले, मात्र नंतर तिच्यावर माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी सतत दबाव टाकत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच, कपिल बागुल याचे धुळे येथील प्रज्ञा महेश कर्डीले हिच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचे शारदा यांना समजल्यावर त्यांनी त्यास विरोध केला होता.
शारदा यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळेच शारदाचा छळ करून खून केला. मृत्यूच्या दिवशी कपिल बागुल यांनी फोन करून तिच्या मृत्यूची माहिती दिली आणि तातडीने अंत्यसंस्कार करण्याचे सांगितले. मात्र नातलगांनी वेळेत धुळे गाठून पोलिसांना शारदाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिली.
पोलीस तपासात शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. शारदा यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे आणि विषप्रयोगाचे संकेत अहवालात स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांवरील अत्याचारासंबंधी त्वरित पोलिसांना कळवावे
याप्रकरणी कपिल बाळू बागुल, त्याचे वडील बाळू बुधा बागुल, आई विजया बाळू बागुल, बहीण रंजना धनेश माळी आणि प्रज्ञा महेश कर्डीले या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, नागरिकांनी महिलांवरील अत्याचारासंबंधी कोणतीही माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Discussion about this post