धुळे । शिंदखेडा – साक्री राज्य मार्गावरील आरावे (ता. शिंदखेडा) गाव शिवारात रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून कार थेट नाल्यात पडली. यात एका जणाचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले.
घटनेबाबत असे की, इंदवे येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे संस्था चालक किरण पदमोर, लिपीक सज्जन पदमोर त्यांचे मेहुणे तथा नंदुरबारचे महसूल मंडळ अधिकारी श्री. गर्दे व जितेंद्र सोनवणे हे कारने धुळ्याहून चिमठाणे मार्गे हट्टी (ता.साक्री) गावाकडे घरी परत जात होते. यावेळी त्यांची कार चिमठाणे गावाच्या पुढे आरावे गावशिवारातील पुलाजवळ आली. यावेळी कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट नाल्याच्या पाण्यात पडली.
कार नाल्यात पडल्याची माहिती गावात समजताच गावातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र या अपघातात लिपिक सजन पदभोर (रा.हट्टी) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जुन्या नाल्यावर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा अंदाज चालकास न आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Discussion about this post