धुळे । लग्नासाठी मुलगी दाखवून विवाह करण्याचे सांगून लाखो रुपयांचा गंडा घालून पसार होणाऱ्या बंटी बबलीच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यासह मदत करणाऱ्या आणखी दोन मुलींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विवाहासाठी मुलीचा शोध घेत असलेल्या मुलांचा शोध घेऊन लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील एका आंतरराज्य टोळीचा चाळीसगाव रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील एका ३५ वर्षीय तरुणाला १ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालून बनावट लग्न लावल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एजंटसह तीन महिलांना अटक केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवल्याची कबुली दिली आहे.
धुळे शहरातील पीडित तरुणाला लग्नासाठी स्थळ शोधताना एजंट सचिन मरगडे याचा संपर्क क्रमांक मिळाला होता. मरगडे याने तरुणाला काजल नावाच्या मुलीसोबत १ लाख ३० हजार रुपये घेऊन खैरनार यांचे लग्न लावून दिले. मात्र काही दिवसांतच पत्नीच्या वागणुकीवर संशय आल्याने खैरनार यांनी तिची माहिती काढली. यात ती आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. यानंतर खैरनार यांनी हुशारी दाखवत, मित्रासाठी स्थळ हवे असल्याचे भासवून एजंटला पुन्हा बोलावले.
त्यानुसार एजंट दुसऱ्या मुलीला घेऊन येताच आधीच तयारीत असलेल्या चाळीसगाव रोड पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सचिन मरगडे, बनावट नवरी काजल आणि तिच्या दोन महिला साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी काही तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान चाळीसगांवरोड पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.















Discussion about this post