धुळे : औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 300 किलो बनावट पनीर जप्त केलं. जप्त केलेल्या पनीरमध्ये घातक रसायन मिसळले जात असल्याचे आढळून आले असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला धुळे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रसायनयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली. त्यानुसार कंपनीवर गुप्तपणे टेहळणी करत छापा टाकण्यात आला.
300 किलो पनीर जप्त
पनीरमधून आवश्यक असणारे फॅट काढून टाकलेले दूध पावडर आणि घातक रसायन एकत्र करून पनीर बनवले जात होते. हे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवरे आणि दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील उपस्थित होते. संशयित रसायनाचा सखोल अभ्यास करून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कारखान्यात काम करणाऱ्या सहा जणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, मोहाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post