धुळे । धुळ्यात भीषण अपघाताची घटना घडली असून मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील तिघे जण रस्त्यावर फेकले गेले आणि त्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिन्ही मृतांची ओळख पटली आहे. पोलिसांनी डंपर चालकासह वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास नरडाणा पोलीस आणि वाहतूक पोलीस करत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी या महामार्गावर वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे.















Discussion about this post