मुंबई । बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरल्या होत्या. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता त्यांचं पार्थिव विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आलं. देओल कुटुंबीयांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.















Discussion about this post