धरणगाव । सोमवारी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. मात्र या यादरम्यान, धूलिवंदन खेळून तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली. जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
धरणगावमधील लोहार गल्ली जितेंद्र माळी हा आई, वडील, भाऊ, बहिणीसह राहत होता. मोलमजुरी करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. दरम्यान, धूलिवंदनच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे मयत जितेंद्रच्या आई – वडिलांनी एकच आक्रोश केला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
Discussion about this post