जळगाव । वाढत्या अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी होत असलेले प्रयत्न कमी पडत असून मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी सुरुच आहे. याच दरम्यान वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी थेट गिरणा नदीपात्रात उडी घेत पोहत पोहत तस्करापर्यंत गेले आहेत. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून बैठक आटोपून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी त्यांना गिरणा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्यासं दिसून आलं. यानंतर महेंद्र सूर्यवंशी यांनी त्यांचं वाहन उभे करून ते थेट नदीपात्रात उतरले. कपडे काढून नदीतून पोहत जाऊन त्यांनी वाळू चोरट्यांचा पाठलाग केला.
चक्क तहसीलदार आपल्याकडे येत असल्याचे समजताच वाळू चोरी करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. त्यांनी लगेच तिथून पळ काढला. चोरी करणारे ट्रॅक्टर तसेच कामगार तिथून पसार झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तहसीलदार साहेब पोहोत तस्करांपर्यंत जाताना आणि वाळू चोर घाबरून तिथून पळून जाताना या व्हिडीओत दिसत आहे.
तहसीलदारांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक
दरम्यान, अनेक सरकारी अधिकारी वाळू तस्करांना घाबरून असतात. वाळू तस्करीसाठी आडकाठी केल्यामुळे अनेकांनी तहसीलदारांवर हल्ला केल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र कशाचाही तमा न बाळगता वाळू चोरट्यांवरील कारवाईसाठी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि कर्तव्य निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी एकटेच कारवाईसाठी नदीपात्रातून पोहत गेल्याचा या कारवाईच्या प्रयत्नाची तसेच त्यांनी दाखवलेल्या धाडसाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही या व्हिडिओसह बातमीला दुजोरा दिला आहे.
Discussion about this post