जळगाव । जळगाव जिल्ह्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल 40 किलोपेक्षा अधिक गांजासह एक चारचाकी जप्त केली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख 10 हजार रुपये असून, आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला आहे.
याबाबत असे की, चोपडा रोडकडून येणाऱ्या मेटालिक सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट डिझायर (MH01 DP 0252) चारचाकीला चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन न थांबवता शहराकडे वेगाने पळ काढला. यावेळी सुधीर चौधरी, सत्यवान पवार व किशोर भोई यांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला. पारोळा नाक्याजवळील रेल्वे बोगद्याकडे जाताना वाहनचालकाने वाहन सोडून पळ काढला.
यावेळी वाहन तपासणीदरम्यान चारचाकीमधून 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा आढळून आला आहे. या गांजाची किमत 10,10,600 रुपये आहे. वाहनासह एकूण 20,10,600 रुपयांचा मुद्देमाल पाेलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी किशोर देविदास भोई यांच्या फिर्यादीवरून संशयित वाहना चालकाविरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post