जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या काही कमी होताना दिसत असून अशातच आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. ज्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) याला एसीबीने रंगेहात अटक केली. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली.
तक्रारदाराने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार २२ मार्च रोजी दुपारी सापळा रचण्यात आला. आरोपी ब्राम्हणे यांनी २५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
Discussion about this post