धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारी भंगार साठवणूक गोडाऊनमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत बिघाडामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आगीने काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण केल्याने परिसर धुराच्या ढगांनी व्यापला गेला. आकाशात उसळणारे धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून नागरिकांनी सुरक्षित अंतरावरून घटनास्थळाकडे गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल की काय, अशी भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली होती.
गोडाऊनच्या शेजारीच महावितरणचे 132 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र असल्यामुळे सुरुवातीला प्रशासनाची धावपळ उडाली. वीजपुरवठा यंत्रणेवर परिणाम होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात आली. सुदैवाने आग उपकेंद्रापर्यंत पोहोचली नाही.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव, अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.
या घटनेत जीवितहानी टळली असली तरी भंगार साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.















Discussion about this post